बल्लारपूर : जागतिक वनदिनानिमित्त उपवनसंरक्षक कार्यालय चंद्रपूर येथे वनविभागात वनसंरक्षण व वनसंवर्धन करून अतुलनीय काम करणाऱ्या ३० वनरक्षक, वनपाल व वाहन चालक तसेच उत्कृष्ट कार्यालयीन कामे पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक प्रीतमसिंग कोडापे, अमोल गर्कल, तसेच मध्य चांदा वनविभागाचे सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अरविंद मुंढे यांनी वनसंवर्धन व वनसंरक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच वन्यप्राणी शिकार प्रकरणे, वनजमिनीवरील अतिक्रमण हटविणे, वनाचे आगीपासून संरक्षण करणे, उत्कृष्ट रोपवने तयार करणे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करणे व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे इत्यादी अनेक बाबींमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, अशी माहिती बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली.