चंद्रपूर : ‘तीन वाॅर्ड, एक प्रभाग’ हा निर्णय सर्वसामान्य लोकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे मनपासमोर या विधेयकाची होळी करण्यात आली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये तीन वाॅर्ड, एक प्रभाग, तीन नगरसेवक अशी रचना करण्यात आली आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेसाठी एक वाॅर्ड, एक नगरसेवक अशी पद्धत ठेवली आहे. एक महाराष्ट्र, एक नियम या धर्तीवर निर्णय अपेक्षित होते. परंतु, हा निर्णय सरळ-सरळ सामान्य लोकांवर अन्याय करणारा आहे. तसेच वास्तविक प्रभाग पद्धतीमध्ये क्षेत्र मोठे असल्याने वॉर्डाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकत नाही. याउलट याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला, तसाच एक वाॅर्ड, एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा, अशी मागणी घेऊन संभाजी ब्रिगेडतर्फे तीन वॉर्ड, एक प्रभाग विधेयकाची मनपासमोर होळी करण्यात आली.
यावेळी मागण्यांचे निवेदन भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे डॉ. राजू ताटेवार, डॉ. राकेश गावतुरे, ॲड. प्रशांत सोनुले, विजय मुसळे, डॉ. सिराज खान, ॲड. प्रशांत गव्हाणे, श्रीकांत शेंडे, हेमंत भगत, सोनल भगत, छाया सोनुले, संगीता पेटकुले, रेखा लेनगुरे, आदी उपस्थित होते.