नागभीड : गोसीखुर्दचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यासाठी मदत करावी, असे साकडे घोडाझरी संघर्ष समितीने आमदार विजय वडट्टीवार यांना घातले आहे.घोडाझरी तलावाच्या लाभक्षेत्रात नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील ५८ गावातील सात हजार हेक्टर शेतजमीन येते. मात्र पुरेशा पावसाअभावी ही शेतजमीन दरवर्षी माखून जाते. घोडाझरी तलावाची पाणी साठवणूक क्षमता उत्तम असली तरी गेल्या काही वर्षात पाऊस बरोबर पडत नसल्याने तलाव पूर्णपणे भरत नाही आणि वितरीकाही कामातून गेल्या आहेत. याचा परिणाम सिंचनावर होत आहे.हे सर्व टाळण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या धर्तीवर घोडाझरी तलावातही गोसीखुर्दचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीने जोर धरला आहे. यासाठी घोडाझरी संघर्ष समिीची स्थापना करण्यात आली असून या समितीने यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींना निवेदन देवून सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. नागभीड येथील विश्रम भवनात आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक ईश्वर कामडी, संजय अगडे व समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
घोडाझरी तलावात पाणी सोडण्यासाठी आमदारांना साकडे
By admin | Updated: November 11, 2015 00:39 IST