कुलगुरू प्रा. वरखेडी यांचे प्रतिपादन : पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
ब्रह्मपुरी : येथील परिसरात उत्तम सेवा देण्याचे कार्य हे महाविद्यालय करीत आहे. येथे जसे अन्न निर्माण होते, तशी विद्याही विद्यार्थ्यांना दिली जाते. आपल्याकडे आज एक प्रमाणपत्र आहे, त्यावरील गुणांचा एक अर्थ अंक आहे, तर दुसरा अर्थज्ञान होय. पदवी प्रमाणपत्रात जी रिकामी जागा आहे, ती तुम्हांला निरंतर भरावयाची आहे आणि तीच तुमची मोठी उपलब्धी असणार आहे. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाने केवळ विद्या नाही, तर संस्कारही दिले आहेत. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.
ते येथील स्व.कर्मयोगी मदनगोपालजी भैया सभागृहात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, तर प्रमुख अतिथीमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी प्र- कुलगुरू डॉ. एस. एस. कावळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव अशोक किसनलाल भैया, सहसचिव ॲड. बी. आर. उराडे, सदस्य प्रा. जी. एन. केला, उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, प्रभारी डॉ. मोहन वाडेकर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेच्या वतीने कुलगुरू व प्र-कुलगुरुंचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. धनराज खानोरकर, डॉ. दर्शना उराडे, प्रा. आकाश मेश्राम यांनी केले, तर आभार प्रभारी प्राध्यापक डॉ. मोहन वाडेकर यांनी मानले.