सर्व बाबींचे नियोजन : गाव, तालुका, जिल्हास्तरावर बैठकींचे आयोजनचंद्रपूर : महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा- कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोण चंद्रपूरला पोहचले असून १९ आॅक्टोबरला मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे आयोजनासाठी जिल्हा, तालुका, ग्रामीण व वॉर्डस्तरावार बैठका सुरू आहेत. मोर्चात दहा लाखांवर लोक सहभागी होणार असल्याने वाहतूक, वाहनांची पार्र्कींग, शिस्तबध्दता, आर्थिक जुळवाजुळव याचे नियोजन करण्यात येत आहे. मराठा कुणबीसह इतर ओबीसीदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात येत आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी हा मोर्चा निघाला, तेथील आजवरचे सर्व रेकॉर्ड या मोर्चाने मोडीत काढले. लाखोंच्या संख्येने आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले असले तरी कुठेही शिस्तबध्दता ढासळली नाही. हे या मुक मोर्चाचे वैशिष्टय ठरले आहे. विदर्भात अमरावती, यवतमाळनंतर या मोर्चाचे लोन चंद्रपुरातही पोहचले आहे. सकल मराठा-कुणबी क्रांती मुक मोर्चा, चंद्रपूर जिल्हा या नावाने जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत जिल्हाभर या मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत चंद्रपुरात या संदर्भात दोन बैठका पार पडल्या असून २ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता येथील मातोश्री सभागृहात तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरसह राजुरा, जिवती, चंद्रपूर, भद्रावती, मूल, सिंदेवाही, वरोरा, बल्लारपूर, कोरपना, गडचांदूर, नागभीड, ब्रह्मपुरी येथेही बैठका पार पडल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणासोबतच गावखेड्यातही कार्नर सभा घेण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणाच्या प्राथमिक बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कोपर्डीच्या नराधमला फाशी, ओबीसीेचे आरक्षण, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या संदर्भात समाजात जागृत करण्याचे काम विविध स्तरावरील कार्यकर्ते करीत आहे. ग्रामस्तरापासून तर तालुकास्तरापर्यंत जिल्ह्यापर्यंत होर्डिंग्ज, बॅनर लावून समाजातर्फे जनजागृती केली जात आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याच्या शाळा, महाविद्यालय, विविध डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, महिला, शेतकरी इतर सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. २ आॅक्टोबरला भद्रावती येथील आमने सभागृहात तर वरोरा येथे नगरपालिका सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. (शहर प्रतिनिधी)वाहतूक, पार्किंगचेही नियोजनसदर मोर्चात दहा लाख लोक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येत लोक चंद्रपुरात एकवटणार असल्यामुळे गोंधळ होऊन कुणलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आयोजकांकडूनच नियोजन केले जात आहे. चंद्रपुरात येण्यासाठी वाहनांची व्यवस्था, आल्यानंतर कोणत्या तालुक्याची वाहने कुठे पार्क केली जातील, मोर्चा संपल्यानंतर वाहन सुटलेच तर कुठे संपर्क साधायचा या सर्व बाबींचे नियोजन केले जात आहे. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचीही गरज पडणार असल्याने आंदोलनकर्त्यांकडून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. चंद्रपुरात चार कार्यालयया मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूर शहरात जटपुरा गेट, तुकूम, गांधी चौक, वरोरा नाका अशा चार ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा कार्यालये सुरू झाली आहे. यामध्ये आयटी वार रुमसुद्धा कार्यरत असून सोशल मिडीयाद्वारे जोरदार प्रचार- प्रसार सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आज शनिवारी जटपुरा गेटजवळच्या राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या सभागृहात प्राचार्य अशोक जीवतोडे यांच्या हस्ते आयटी वार रुमचे उदघाटन करण्यात आले.
मराठा मूक मोर्चाची जिल्हाभर जोरदार तयारी
By admin | Updated: October 2, 2016 00:45 IST