नंदोरी: येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यस्मण सोहळ्याला शुक्रवारी आरोग्य तपासणी शिबिराला प्रारंभ झाला.नंदोरी येथील श्री संत गमाजी महाराज विकास मंडळ व श्री साई सेवा समितीच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले. शिबिरात १३२ जणांची आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी सत्यसाई सेवा समितीच्या सदस्यांनी भजन सादर केले. राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी पहाटे ४ ते ५ या वेळात ग्रामसफाई, त्यानंतर नंदोरीच्या सरपंच अनुराधा पिंपळकर, माधो खामनकर, तुळशिदास लांबट यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सामूहिक ध्यान व ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य मनोहर कामडे यांनी ग्रामगितेचे वाचन केले तर विठ्ठलराव अंड्रसकर यांनी मार्गदर्शन केले. ३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गावकरी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
आरोग्य तपासणी शिबिराने राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्याला प्रारंभ
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST