कापूस उत्पादकांच्या समस्या वाढल्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अवेळी पाऊस, बोंड अळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. यंदा कीडीने कपाशीचे उत्पादन घटले आहे. काही शेतकऱ्यांना खर्च निघणार की नाही, हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु, रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जनावरांना टॅग लावण्याची मागणी
चंद्रपूर : तालुक्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळू जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जनावरांना टॅग लावून नोंदणी करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
---