चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कोरोना काळामध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांनी पोलीस ठाण्याची पायरीही चढली आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आता संयु्क्त कुटुंब पद्धती कमी होत आहे. प्रत्येक जण विभक्त कुटुंबामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक कुटुंबात पती-पत्नींमध्ये वाद विकोपाला जात आहे. यामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीही कारणीभूत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. विशेषत: शारीरिक, आर्थिक, लैंगिक आणि राजकीय कारण यामागे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पती-पत्नींमध्ये वाद झाला तरीही महिलांच्या बाजूचे कायदे भक्कम असल्यामुळेच अनेकवेळा कारण नसतानाही पती मुकाट्याने त्रास सहन करीत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याचा वापर करा, मात्र, गैरवापर करून एखाद्याला त्रास देण्याचा प्रकार टाळा, असेही भारतीय परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे.
बाॅक्स
आर्थिक टंचाई आणि अति सहवास
कुटुंबामध्ये कलह होण्याच्या मुख्य कारणांमध्ये आर्थिक, शारिरीक, लैंगिक, राजकीय तसेच घरघुती कारणे आहेत. या कारणांमुळे अनेक कुटुंबे तुटली आहेत. नवऱ्याला, जावयाचा धडा शिकवू या कारणामुळेही अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
बाॅक्स
कोरोना काळात तक्रारी वाढल्या
कोरोना काळ सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे. लाॅकडाऊनच्या काळामध्ये काहींच्या घरी आर्थिक ताण पडला. त्यामुळे कुटुंबांमध्ये कलह वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांनाच सुटी असल्यामुळे घरची मंडळी घरात रहात असल्यामुळेही अनेकांच्या घरात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पती,पत्नीमध्ये वाढ विकोपाला गेले आहेत.
बाॅक्स
मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते
१.सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद विकोपाला जात आहे. वडिलधाऱ्यांचा धाक राहत नाही. त्यामुळे मानसिकच नाही तर मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत.
२.पती-पत्नीच्या भांडणामध्ये मोबाईल मुख्य भूमिका बजावत आहे. यामुळे अनेकांच्या घरात भांडणे होत असून गैरसमजही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
बाॅक्स
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
कधी कायद्याचा गैरवापर करून तर कधी कायद्याचा धाक दाखवून पती तसेच सासरच्या मंडळींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक परिवार पीडित आहेत. कोरोना काळामध्ये या तक्रारी काही प्रमाणात वाढल्या आहेत. अशा एकमेकांपासून दुरावलेल्या परिवाराला भांडणापासून वाचविण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जात आहेत.
-डाॅ. नंदकिशोर मैंदळकर
जिल्हाध्यक्ष
भारतीय परिवार बचाव संघटना, चंद्रपूर