खुशीचा सत्कार : पोलीस प्रशासनाचा अभिनव उपक्रम चंद्रपूर : आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान माणसांचे सत्कार सोहळे नेहमी अनुभवतो. मात्र, निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत पोलीस प्रशासनाने वर्षाच्या शेवटच्या दिवशी खुशीचा सत्कार केला. खुशीने तब्बल सहा वर्षे पोलीस विभागात सेवा दिली. खुशी हे श्वान २२ नोव्हेंबर २००८ रोजी नागपुरातील ब्रिडरकडे जन्माला आले. फेब्रुवारी २००९ ला खुशी जिल्ह्याच्या आस्थापनेवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने रुजू झाली. २०१० वर्षात पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात तिने यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात कार्यरत राहिली. व्हीव्हीआयपटी, महामार्ग घातपातविरोधी तपासणी आणि मर्मस्थळाचे अपघातविरोधी तपासणीबाबतचे ५३८ कॉल तीने केले होते. २० फेब्रुवारी २०१६ रोजी कर्तव्यावर तिला अर्धागवायूचा झटका आला. तेव्हापासून सतत खुशीवर नागपुरातील पशुचिकित्सालयात उपचार सुरु होते. शनिवारी ती सेवेतून निवृत्त झाली. कार्यक्रमानंतर खुशीची पूर्वीपासून देखभाल करणारे पोलीस नाईक बंडू पोयाम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. खुशीच्या कर्तव्याचा सन्मान आणि भविष्यातील उदरनिर्वाहाकरिता एक भेटवस्तू आणि काही राशी पोलीस अधीक्षकांनी पोयाम यांना दिली. (नगर प्रतिनिधी)
सहा वर्षानंतर ‘खुशी’ निवृत्त
By admin | Updated: January 2, 2017 01:13 IST