अनेकांनी बघितला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ : चित्रपट पाहण्यासाठी खास व्यवस्था प्रवीण खिरटकर वरोरा१९७० च्या दशकात गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या कुठल्याही सुविधा पोहचल्या नसताना आदिवासी व अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याची विनामूल्य सेवा डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दिली. त्यांच्यावर नुकताच ‘द रियल हिरो डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट काढण्यात आला. २६ जुलै रोजी एका चॅनलवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर शो दाखविण्यात आला. हा चित्रपट आनंदवनवासीयांनी सामूहिकरीत्या पाहून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या कार्याला सलाम ठोकत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.१९७० च्या दशकात कर्मयोगी बाबा आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादारी प्रकल्पाची स्थापना केली. आरोग्य व शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा याकरिता प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता कर्मयोगी बाबांनी स्थापलेल्या प्रकल्पाची धुरा वैद्यकीय क्षेत्रात उच्चविद्याविभूषित असलेले डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी घेतली. प्रकल्पाच्या शेजारील गावात शासनाच्या कुठल्याही सुविधा पोहचल्या नाही. त्या ठिकाणी जावून विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून आमटे दाम्पत्यांकडून सुरू आहे. आदिवासींची भाषा शिकून घेत त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधून उपचार सुरू केल्याने अतिदुर्गम भागातील नागरिकांना डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यामध्ये आशेचा किरण दिसू लागला. आजही ही सेवा अविरहितपणणे सुरू आहे. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना शासनाने अनेक पुरस्कार देवून गौरवित केले. त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर आधारीत ‘द रिअल हिरो डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट काढण्यात आला. हा चित्रपट आनंदवनातील प्रत्येकांनी बघावा याकरिता २६ जुलै रोजी आनंदवनातील मुक्तांगण, लोटीरमन, स्नेहसावली, सार्वजनिक गोदाम, मुक्ती सदन, कृषी निकेतन, संधी निकेतन, रुग्णालय गोकुळ सभागृहात चित्रपट बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आनंदवनातील प्रत्येकांनी हा चित्रपट बघत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची माहिती घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी वहिनीचे मागील कित्येक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कार्य सुरू आहे. हे कार्य चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बघितल्याने आपण भारावून गेलो.- ज्ञानेश्वर धुर्वे, आनंदवनवासीयडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांचे कार्य चित्रपटातून बघितले, हे कार्य महान आहे.- तानेबाई चौधरी, आनंदवनवासीय
‘द रियल हिरो’च्या कार्याला आनंदवनवासीयांचा सलाम
By admin | Updated: July 30, 2015 01:02 IST