जिल्हा सामान्य रूग्णालय : इंटरनेट बंदमुळे प्रचंड मनस्ताप चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग नोंदणी प्रमाणपत्रासाठी अपंगाचा जीव टांगणीला लागला आहे. आठवड्यातून फक्त बुधवारी या एकाच दिवशी येथे प्रमाणपत्राचे वितरण व तपासणी केली जाते. मात्र सतत नेट बंद राहत असल्याने अपंगाना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी तासन्तास प्रतीक्षा करूनही प्रमाणपत्राविनाच परत जाण्याची वेळ येत असल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात बुधवारी दिसून आला.शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्यांना शासनाकडून अपंग प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना विविध क्षेत्रात लाभ मिळत असते. यापूर्वी अपंगाना स्थानिक स्तरावर तपासणी करुन स्थानिक वैद्यकीय अधिकारी अपंग प्रमाणपत्र देत होते. मात्र, अनेकांच्या बाबतीत ‘तो’ अपंग नसतानाही त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अपंग प्रमाणपत्र वाटपातील घोळ लक्षात घेता, अपंगांची जिल्हास्तरावर तपासणी करून आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगाची तपासणी करुन प्रमाणपत्राचे वितरण केले जाते आहे. या प्रमाणपत्राचे दर दोन वर्षानी नुतणीकरण करावे लागते. बुधवारी अनेक अपंग नवीन प्रमाणपत्र व प्रमाणपत्राचे नुतणीकरण करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात आले होते. मात्र सकाळपासूनच नेट बंद होता. त्यामुळे आलेल्या अपंगांना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. मात्र बराच वेळ होऊनही नेट सुरू झाला नाही. त्यामुळे अनेकांनी घरी जाणे सोयीचे समजले. जिल्ह्यात एकाच ठिकाणी अपंगांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरीत होत असल्याने दूरवरून अनेक जण रूग्णालयात येतात. मात्र नेट बंद असले तर तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा आल्या पावली परत जावे लागते. यावर रूग्णालय प्रशासनाची कोणतीही दुसरी उपाययोजना नसल्याने अपंगानी तीव्र असंतोष व्यक्त केला. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रमाणपत्रासाठी अपंगांचा जीव टांगणीला
By admin | Updated: April 14, 2016 01:03 IST