चिमूर तालुक्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास व पदस्पर्श लाभला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रसंताच्या गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी आहेत. राष्ट्रसंताने आपल्या विचारातून, भजनातून व कृतीतून गावाचे महत्त्व व विकास कसा करावा, हे दाखवून दिले. त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीता या ग्रंथात आदर्श गावाकरिता उत्तम नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, हे सांगितले आहे. यामुळे चिमूर येथील नवीन पंचायत समितीमधील सभागृहाला राष्ट्रसंताचे नाव दिल्यास, सभागृहात असभ्य वर्तन सोडून राष्ट्रसंताला स्मरून उपस्थितांकडून शांतता व स्वच्छता ठेवून ग्रामविकास साधला जावा, या हेतूने पंचायत समितीचे उसभापती रोशन ढोक यांनी पंचायत समितीच्या सभागृहाला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह’ असे नामकरण करण्याचे ठरविले. या प्रस्तावाला सभापती लता पिसे, संवर्ग विकास अधिकारी धनजंय साळवे, पं.स. सदस्य शांताराम सेलवटकर, पुंडलिक मत्ते, प्रदीप कामडी, नर्मदा रामटेके, गीता कारमेंगे यांनी एकमताने मंजुरी दिली.
राष्ट्रसंताच्या नावाने ओळखले जाईल ते सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST