सिंदेवाही : गावखेड्यातील रस्त्यावरील दिवाबत्तीचा खर्च जिल्हा परिषद उचलत आलेली आहे. गत बऱ्याच दिवसांपासून सदर विजेचे बिल थकल्याने विभागाने ग्रामपंचायतीला बिल भरण्याचे सुचविले आहे. मात्र, वीज बिल भरण्याची ऐपत ग्रामपंचायतच्या तिजोरीत नसल्याने गावाची दिवाबत्ती गुल होण्याची शक्यता आहे.
दिवसेंदिवस ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटत चालले आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. कित्येक ग्रामपंचायतीला स्वतःचा खर्च भागविणे कठीण आहे. गावातील जनता गरिबीत असल्याने दरवर्षी नियमित करभरणा होत नाही. थकीत कर्जाचे प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या स्वरूपात आहे. त्यामुळे आवक अर्थात उत्पन्न अत्यल्प होत चालले. स्थानिक ठिकाणचे पदाधिकारी राजकारणाच्या मैदानात असल्याने जनतेशी करवसुलीच्या बाबतीत कडक कारवाई करत नाही. त्यामुळे निश्चितच उत्पन्नात घट शक्य आहे. ऑनलाईन दाखल्याने सामान्य जनतेला ग्रामपंचायतीसोबत अपेक्षित कामे राहिली नाही. त्यामुळे जनतेकडून करवसुली करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अजूनपर्यंत ठोस कारवाई होताना दिसत नाही. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत दिवाबत्तीसाठी विशेष निधी पुरविला जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु तो निधी मिळाला नसल्याने बिलाची भरपाई होऊ शकली नाही. त्यामुळे तालुक्याचे अनेक ग्रामपंचायतींची बिले थकीत राहिले आहे. वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहेत व वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.