चंद्रपूर : जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती अंगणवाडी महिलांना व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी महिलांच्या मेळाव्यात हे मार्गदर्शन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जादुटोणा विरोधी कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या बारा कलमांची माहिती पोस्टरच्या सहाय्याने दिली व जादुटोणा, भूत भानामती, चमत्कार हे एक थोतांड आहे. तसेच पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने तिर्थ काढणे, अंगातील भूत काढणे, आदी चमत्कार दाखवून त्या मागील शास्त्रीय कारणांची माहिती दिली. कोणीही सिद्ध करुन दाखवत असल्यास त्याला २१ लाखांचे बक्षिस दिल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले, फसवेगिरी करणाऱ्या ढोंगी सांधुंना शासनकर्ते पाठीशी घालतात. हे ढोंगी जनतेला फसवून त्यांची लुबाडणूक करतात. अशा या ढोंगी साधूंना शासनकर्ते पाठीशी घालत असल्यानेच मांत्रिक चंद्रास्वामी, आसाराम, रामपाल यांचा जन्म होतो.हे लहान गुन्हेगार असून या बदमाशांना प्रोत्साहन देऊन त्यांना पाठीशी घालणारे मोठे गुन्हेगार आहेत, त्यांचाही शोध लागला पाहिजे. आसाराम जेलमध्ये नसते तर मोदींच्या निवडणुकीत तेच प्रमुख प्रचारक राहिले असते. गायत्री यज्ञाचा अर्थ आपण आपल्या अर्थमंत्र्याला विचारला पाहिजे, असेही मत प्रा. दहीवडे म्हणाले. सुलोचना गोडसेलवार यांनी आभार मानेले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मिराबाई झाडे, मालन दुर्गे, दया निमगडे, पंचफुला गेडाम यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
अंगणवाडी महिलांना जादूटोणा कायद्याविषयी मार्गदर्शन
By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST