गेवरा : घरातील महिलेचे आरोग्य सुरक्षित असेल संपूर्ण कुटुंब सुखी व सुरक्षित राहील, यासाठी स्वच्छ चंद्रपूर जिल्हा महिला अस्तित्व पर्वाचे यशस्वी आयोजन करणे गरजेचे आहे. याकरिता २ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या पर्वाचे औचित्य साधून पंचायत समिती सावली मार्फत तालुकास्तरीय जागतीक शौचालय दिन पंचायत समिती सभागृहात पार पडले.जिल्हा परिषद चंद्रपूर स्वच्छ भारत मिशनकरिता सहभागी सन २०१५ या वित्तीय वर्षात सावली पंचायत समितीतील निवडक ११ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांना या उपक्रमाची तांत्रीक माहिती व जाणिव जागृती व्हावी या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ११ ग्रामपंचायतीनी १०० टक्के हागणदारी मुक्त गाव करण्याचा संकल्प कार्यशाळेत केला. सध्या स्थितीत सावली तालुक्यातील ३ ग्रामपंचायती १०० टक्के शौचालय बांधून हागणदारी मुक्त झालेल्या असल्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक गटविकास अधिकारी आशा ठवसे, विस्तार अधिकारी पंचायत दक्षक मुन यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती चंदा लेनगुरे, उपसभापती मंगला चिमड्यालवार, पंचायत समिती सदस्य राकेश गड्डमवार, अनिता चुनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.बी. ठोंबरे, संजय नैताम, अशोक बुराडे, के.डी. खोब्रागडे, डी.टी. कन्नाके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेकरिता प्रत्यक्ष लाभार्थी म्हणून ११ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे संचालन दक्षक मुन, यांनी केले. प्रास्ताविक आशा ठवळे तर आभार संजय दुधबडे यांनी मानले. (वार्ताहर)
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना शौचालयाबाबत मार्गदर्शन
By admin | Updated: November 22, 2015 00:56 IST