खांबाडा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे गावातील पुढारी व उमेदवारांना आता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांची आठवण सतावू लागली आहे. अनेक नागरिक पोटापाण्याचा प्रश्न घेऊन शहर वा दुसऱ्या गावखेड्यांकडे रोजगार व नोकरीच्या शोधात गेले. ही मंडळी आता तिकडेच स्थायिक झाली आहेत. ही मते आपल्या झोळीत पडावीत म्हणून उमदेवारांचा या मतदारांवर डोळा आहे.
गावपुढारी व उमेदवार या मतदारांशी फोनवरून संपर्क साधून ताई, आक्का, मावशी, काका, दादा, वहिनी, आजी, आजोबा अशा गोड शब्दात तुम्हाला गावाकडे यावेच लागेल. मी ग्रामपंचायतीकरिता उभा आहे, अशी साद घालत आहे. १५ जानेवारीला या मतदारांना मतदानासाठी गावाकडे कसे आणायचे, यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुका अटीतटीच्या होत असल्याने या मतदारांचे मतही बहुमोल ठरणार आहे. ही बाब विचारात घेऊन उमेदवार बाहेरगावी स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानासाठी येण्याचे साकडे घालत आहेत.