राजुरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी मोहिम शासनाकडून राबविण्यात आली. या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील लावलेल्या वृक्षाची तपासणी करण्यात आली असून त्याची जाणीव व माहिती गावकऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासणी अहवालची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्याची मागणी विविध संघटना व गावकऱ्यांनी केली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मार्फत सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये शासनाने लाखो रुपये खर्च करुन वृक्ष लागवड केली. यात बऱ्याच ग्रामपंचायतद्वारे वृक्षांची लागवड न करता लागवड दाखवून लाखो रुपयाची उचल करण्यात आली आहे. अनेक ग्रामसेवकांनी झाडे नेवून लागवड न करता वाळलेले झाडे कचऱ्यात फेकून दिले आहे. ग्रामपंचायत स्तरावर लावलेल्या झाडाची संख्या व जिवंत झाडाची तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येवू शकते. लक्कडकोट येथील वृक्ष लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटीकेतील झाडे जागेवरच वाळून गेले आहे. सन २०११ पासून लावण्यात आलेल्या झाडाची उंची सध्या १० फुटापेक्षा जास्त असावयास पाहिजे. परंतु तपासणी होणार असल्यामुळे काही ग्रामसेवकांनी यावर्षी झाडे लावून देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाना तपासणी अहवालात काय नमूद केले आहे. याची माहिती देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावकरी ग्रामपंचायतीला कराची रक्कम देत असल्यामुळे माहिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याने तपासणी अहवालची प्रत ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्याची मागणी विविध संघटना व गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात काहींनी शासनाकडे निवेदनही पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वृक्ष लागवड तपासणी अहवाल ग्रामपंचायतींनी प्रसिद्ध करावा
By admin | Updated: September 24, 2014 23:27 IST