कोरपना :
मागील दोन वर्षांपासून नांदाफाटा बाजारपेठेत व गडचांदूर - आवारपूर - वणी राज्यमार्गावर मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने अनेकांचे अपघात झाले असून, नागरिक व व्यापारी कमालीचे त्रस्त झाले आहे.
नागरिकांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता, येथील ग्रामपंचायतीकडून कोणतीच पावले उचलल्या जात नसल्याचे दिसते. ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.
मागील तीन वर्षांपासून नांदाफाटा बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट जनावरांचे जत्थेच्या जत्थे गडचांदूर - आवारपूर - वणी या राज्यमार्गावर बसलेले दिसतात. यामुळे अनेक मोटारसायकलस्वारांचा अपघात होऊन दुखापत झालेली आहे. मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असल्याने नागरिकांना व व्यापारीवर्गाला कमालीचा त्रास होत आहे. मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत घाण करून ठेवतात. मोकाट जनावरे आपल्या दुकानासमोर घाण करू नये, याकरिता दररोज रात्री व्यापारीवर्गाला बॅरिकेटिंग करून ठेवावी लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली; मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कोंडवाडा नसल्याचे सांगत होते. वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीद्वारे कोंडवाडा बनविण्यात आला. कोंडवाडा तयार झाला असतानाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त ग्रामपंचायत करण्यास तयार नाही. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसुली केली जाते. नागरिकांकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप आहे. मोकाट जनावरांमुळे येथील व्यापारी वर्गाला व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य मार्गावर मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.