प्रकाश काळे - गोवरीव्यसनाकडे झेपावत असलेला समाज विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला बाधा पोहचवत असून जीवनाला कलाटणी देणाऱ्या वयात युवक व्यसनग्रस्त होत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाचे धडेच देऊन चालणार नाही तर सामाजिक भान जोपासत गोवरी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेने गावकऱ्यांच्या व्यसनमुक्तीचा विडा उचलल्याने ही शाळा आता अनेक शाळांसाठी आदर्श ठरणार आहे.राजुरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोवरी शाळेत १ ते ७ वर्ग असून तीन पुरुष व तीन महिला शिक्षक कार्यरत आहे. ज्ञानदानासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शिक्षणातून विद्यार्थी घडत असला तरी यातून गावकऱ्यांसाठी काही नविन करता येते का, या विचारमंथनातून गोवरी येथील जि.प. प्राथमिक शाळेने गावकऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी, व्यसनामुळे शरिरावर होणारे अनिष्ट परिणाम आणि त्यातून संसाराची होणारी वाताहत, भावी आयुष्यासाठी कशी धोकादायक असते, हे गावकऱ्यांच्या मनावर बिंबविले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना मिळालेल्या वेळेतून उरलेला वेळ गावकऱ्यांसाठी द्यायचा असा नवा सामाजिक दायित्वाचा शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेला विचार गावकऱ्यांसाठी आदर्श ठरणारा आहे. तंबाखुमुक्त अभियानात राज्यात प्रथम पुरस्कार पटकविणाऱ्या शाळेची वाटचाल शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच नाही तर गावकऱ्यांसाठी एक नवी पर्वणी ठरत आहे. शाळेत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले जाते.शाळा विद्यार्थी घडवितात. परंतु गावकऱ्यांच्या व्यसनमुक्तीचा वसा घेतलेली ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच शाळा आहे. यासाठी मुख्याध्यापक अशोक मेश्राम, तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक जहीर खान, संदीप इटनकर, लता लांडे, लता पुसदेकर, कृतिका बुरघाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास देवाळकर यांचे सहकार्य लाभत असून ग्रामपंचायत प्रशासनाने सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केल्यास तो गावासाठी सन्मान ठरेल, एवढे मात्र निश्चित.
गोवरी शाळेने घेतला व्यसनमुक्तीचा वसा
By admin | Updated: January 29, 2015 23:04 IST