शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : गावकरी काही बोलेना जिवती : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शैक्षणिक जनजागृती निर्माण व्हावी, त्यांच्या मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण गावात मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने गाव तिथे शाळेची निर्मिती केली. पण त्या शाळेत नियमित गुरुजी जातात काय व मुलांना शिकवतात काय, हे साधे सूत्र शिक्षण विभागाला हातात घेता न आल्याने माध्यांन्य भोजनानंतर गुरुजी गायब होत असल्याचा प्रकार ३ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झालीगुडा येथे आढळून आला. जिवती पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या झालीगुडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. तेथे सहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या शाळेतील शिक्षक आपल्या मर्जीने कधीही येतात अन् कधीही निघून जातात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे. ज्या गावात शाळा आहे, त्या गावात व परिसरात शैक्षणिक जनजागृती झाली नसल्याने शिक्षक दांडी मारत असल्याचे नागरिक म्हणतात. प्रत्येक राष्ट्राचा पाया मजबूत करायचा असेल तर बालवयातच त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शाळा व शिक्षकाची आहे. जर शिक्षकच शाळेत नियमित उपस्थित राहत नसेल. दुपारुन दांडी मारुन असेल तर खऱ्या भारताची सशक्त व सुदृढ पिढी तयार होईल काय, यावर शिक्षण विभागाने चिंतन करण्याची गरज आहे. गाव तिथे शिक्षणाची सोय आहे पण शिक्षणाचे वातावरण नाही. विद्यार्थ्यांचे पालकच पाल्याच्या शिक्षणाबाबत जागरुक नसल्याने पाल्याचे जीवन भरकटत असून रोजगारांच्या शोधात भाकरीसाठी गीत गाणाऱ्या ग्रामस्थांपुढे शिक्षणाचे महत्त्व नगण्यच आहे. गावात शाळा आहे. पण शिक्षणाचे वातावरण नाही, शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गुरुजी आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. केव्हाही शाळेला दांडी मारत असल्याने येथील शैक्षणिक दर्जा घसरला असल्याचे ग्रामस्थ म्हणाले. दोन दिवस माझे चंद्रपूर येथे प्रशिक्षण असल्यामुळे मी आपल्या केंद्रातील कुठल्याच शाळेला भेटी दिल्या नाहीत. -पी.एम. मुसळे, केंद्रप्रमुख मागील आठवड्यापासून शाळेत भेटी दिल्या नाहीत. याबाबत चौकशी करुन संबंधीत शिक्षकावर कारवाई करण्यात येईल. - पालवे, शिक्षण विस्तार अधिकारी
माध्यान्य भोजनानंतर गुड्यातील गुरूजी गायब !
By admin | Updated: August 5, 2016 00:54 IST