गोंडपिपरी :
वेदांत मेहरकुळे
तालुक्यातील मुख्य मार्गपैकी एक असलेल्या गोडपिपरी - खेडी मार्ग रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असून प्रवासी व वाहतूकदार यामुळे त्रस्त झाले आहे.
रुंदीकरणाचे कंत्राट घेणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून मार्गाच्या एका बाजूस खोदकाम करून ठेवल्याने सदर अरुंद व खड्डेमय मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. सध्यस्थितीत गोंडपिपरी - खेडी मार्ग हा धोकादायक बनल्याचे चित्र दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुकास्तरावरून मूल, सावली, नागपूर, गडचिरोली या उत्तरेकडील प्रमुख शहरांकडे जाणारा मुख्य प्रवास मार्ग म्हणून गोंडपिपरी -खेडी मार्गाची ओळख आहे. सद्यस्थितीत दोन आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला गोंडपिपरी - खेडी हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षितच राहिलेला आहे. प्रचंड रहदारी असतानाही सदर मार्गावर आजपर्यंत केवळ डागडुजीचे काम करून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधींचा खर्च केल्याची माहिती आहे. मात्र तत्कालीन भाजपा सरकारच्या काळामध्ये या मार्गाच्या रुंदीकरणाला मुहूर्त गवसला. मात्र रुंदीकरणाचे काम वर्षभर अडकले. तत्पूर्वी कंत्राट मिळताच कंत्राटदाराने मार्गाची एक बाजू खोदून ठेवल्याने सदर मार्गावर किरकोळसह मोठे अपघात घडले. यातच राज्य परिवहन मंडळातील एका वाहनचालकाचा मृत्यूही झाला होता. तर सदर मार्ग रुंदीकरणाच्या कामाचा वाद हा न्यायालयातही पोहोचल्याची माहिती आहे. या सर्व बाबींना आज बराच कालावधी लोटला असूनही मार्गाचे काम आता सुरू झाले आहे. मात्र काम अतिशय कासवगतीने सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे प्रवाशांना तसेच वाहतूकदारांना मार्गक्रमण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.