चंद्रपूर : शासनाच्या सर्व योजना तसेच अनुदान घेऊनही शाळेत पाहिजे तशा सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणार्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शाळेच्या मान्यतेवर आता गडांतर येणार आहे. शिक्षणाधिकार्यांनी पथकाद्वारे केलेल्या पाहणीत अनेक त्रुट्या आढळून आल्या आहे. प्रत्येकांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांंना कोणताही त्रास होऊ नये, आनंददायी वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी शासनाचा भर आहे. मात्र काही शाळा संचालक मोठय़ा प्रमाणात अनुदान लाटूनही सुविधा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. आता मात्र या संस्थावर गडांतर येणार आहे.मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील योगीराज श्री विक्तुबाबा शिक्षण संस्था जुनासुर्लाने १९८४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल सुरु केले. या विद्यालयाला १९८८ मध्ये १00 टक्के अनुदानसुद्धा मिळाले आहे. मात्र तेव्हापासून आजपर्यंंत या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांंना सुविधा पुरविण्यास टाळाटाळ केली जात आहे.शासनाच्या ‘आरटीई’ नुसार शाळेत वर्गखोल्या नाही. शौचालय आहे. मात्र लांब अंतरावर बांधण्यात आले आहे. शाळेला संरक्षण भींतसुद्धा नाही. वाचनालयाची मोडतोड झाली आहे. प्रयोगशाळा नावापुरतीच र्मयादीत आहे. मुख्याध्यापक तसेच लिपिकांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष नाही. विद्यार्थ्यांंना पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था या शाळेने केली नाही. क्रीडा साहित्याचा पत्ता नाही. अशा एक नाही तर अनेक समस्या या शाळेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंना शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्येच शिक्षण दिल्या जात असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या शाळेची मान्यता काढावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने संस्थासंचालक तथा मुख्याध्यापकांना वेळोवेळी शाळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र या पत्राकडे संस्थाचालकांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, शिक्षण संचालकांनी गंभीर दखल घेत शाळेची आरटीई अँक्टनुसार तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकार्यांनी पथकाद्वारे तपासणी केली. त्यात अनेक गौडबंगाल समोर आले आहे. पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे, उपशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी, कोवळी यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)
जुनासुर्ला येथील शाळेच्या मान्यतेवर येणार गंडांतर
By admin | Updated: May 30, 2014 23:35 IST