विभागीय कार्यालयास पुरस्कार देऊन केले सन्मानित
बल्लारपूर : मध्य रेल्वे मुंबईचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बल्लारशाह रेल्वेस्थानकावर विशेष रेलगाडीने येऊन रेल्वे कार्यालयास भेटी दिल्या व विकासकामांसंदर्भात चर्चा केली.
यावेळी महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी रेल्वेच्या सिग्नल परिचलन कार्यालयात जाऊन कामाची माहिती घेतली व त्यांना बक्षीस देऊन पुरस्कृत केले. रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाला भेट देऊन डॉग शो बघितला व परिसराची स्वच्छता पाहून आरपीएफ ठाणेदार महेंद्रकुमार मिश्रा यांना १० हजारांचे बक्षीस देऊन सन्मानित केले. याशिवाय तिकीट आरक्षण कार्यालयात जाऊन तिथल्या कामाची पाहणी केली व त्यांना पुरस्कृत केले. त्यानंतर ड्रॉयव्हर लॉबीचे निरीक्षण करून तेथे ई -पुस्तकाचे उदघाटन केले. त्यांच्यासोबत नागपूरच्या रेल मंडळ प्रबंधक रिचा खरे, सिनियर डिव्हीजन कमर्शियल मॅनेजर कृष्णाथ पाटील व नागपूर व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू उपस्थित होता. महाप्रबंधकांच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकास रंगरंगोटी करण्यात आली.
बॉक्स
रेल यात्री संघटनांत नाराजी
रेल्वे महाव्यवस्थापक येणार म्हणून अनेक संघटनांनी व रेलयात्री संघानी बल्लारशाह रेल्वेस्थानकाच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी तयारी करून ठेवली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने कोणासही भेटू दिले नाही. यामुळे संघटनांनी नाराजी व्यक्त केली.