बल्लारपूर: आजचे युग स्पर्धेचे आहे. परिस्थितीचा विचार न करता आत्मविश्वासाने स्पर्धेला सामारे जाण्याची मानसिकता बाळगा, जिद्द, चिकाटी व परिश्रमाने इच्छाशक्तीच्या बळावर स्पर्धेची तयारी करा. यश खात्रीने मिळते, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाला ज्ञानाची जोड दिल्यास उत्कर्षाचा मार्ग निश्चित गाठता येते, असे मत येथील तहसीलदार तथा परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी कल्पना निळे यांनी केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने आयोजित ग्रामीण भागातील मुलींसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती अॅड. हरिष गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय पेंदाम तर मार्गदर्शक म्हणून तहसीलदार कल्पना निळे, आयटीआयचे प्राचार्य अनुप खुटेमाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे यांची उपस्थिती होते.यावेळी आर. के. सिंगनजुडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परिक्षे संदर्भात व अनुप खुटेमाटे यांनी यशाला गवसनी घालण्यासंदर्भात विविध उदाहरणे सांगून स्पर्धा परिक्षेला सामोरे जाण्यासाठी ध्येय समोर ठेवण्याचे सांगितले. दरम्यान उच्च शिक्षण घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील मुलींना प्रत्येकी २० हजार रुपये धनादेश अनुदान म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात दहेली येथील शितल माणिक देरकर व सोनाली विलास राजुरकर, लावारी येथील स्वाती अशोक राठोड व कळमना येथील सूवर्णा देवराव सोनटक्के यांचा समावेश आहे. याप्रसंगी काही विद्यार्थिंनीनेही आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात विजय पेंदाम यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व विषद केले. यावेळी अनेकश्वर मेश्राम, हरिष गेडाम, सुमन लोहे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वैशाली दुधाने यांनी तर आभार कल्पना देवगडे यांनी मानले. शिबिराला परिसरातील मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
अभ्यासाला ज्ञानाची जोड द्यावी
By admin | Updated: March 26, 2015 00:54 IST