सुधीर मुनगंटीवार : सामाजिक दायित्वाअंतर्गत सायकल वितरण चंद्रपूर : अलिकडे मुली विविध क्षेत्रात पुढे जात आहे. गेल्या काही वर्षात कुठल्याच क्षेत्रात मुली मागे नसल्याचे दिसून येत आहे. मुलींमध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे. चांगली संधी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थींनीसुध्दा पुढे जाऊ शकतात, असे सांगत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थींनींनो खुप शिका आणि आई-वडिलांचे नाव मोठे करा, असे आवाहन केले. सामाजिक दायित्वाअंतर्गत डब्ल्युसीएलच्या वतीने २२ जिल्हा परिषद शाळांमधील ५५३ विद्यार्थिंनींना पालकमंत्र्यांच्या हस्ते सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, डब्ल्युसिएलचे एरिया जनरल मॅनेजर आभासचंद्र सिंह, पंचायत समिती सभापती बंडू माकोडे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा, दूगार्पूरचे सरपंच अमोल ठाकरे, उर्जानगरच्या सरपंच चिमूरकर आदी उपस्थित होते. मुलींना शाळेत जाणे सोईचे व्हावे म्हणून सदर सायकलींचे वितरण करण्यात येत आहे. सायकल हे शिक्षणाचे माध्यम आहे. चांगल्या शिक्षणासाठी सायकलींचा वापर करा आणि भविष्यात खुप शिकून पुढे जा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थिंनींना केले. जिल्हयातील शासकीय शाळांना ई-लर्निगच्या माध्यमातून अत्याधुनिक बनविले जात आहे. अभयारण्यातील बफर झोनमध्ये ९८ शाळांमध्ये ई-लर्निग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचे आमचे धोरण आहे. मुलीही नवीन तंत्रज्ञानापासून मागे राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. डब्ल्युसिएलच्या शक्तीनगर येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी डब्ल्युसिएलची रहिवासी कॉलनी उत्कृष्ठ बनविण्याचे निर्देशही डब्ल्युसिएलला दिले. यासाठी निधीची अडचण भासल्यास कुठल्यातरी मार्गाने निधी उपलब्ध करुन देऊ. परंतु कॉलनीत चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. एरिया जनरल मॅनेजर आभासचंद्र सिंह यांनी प्रास्ताविक केले. ज्या शाळांच्या मुलींना सायकलींचे वितरण करण्यात येत आहे, त्या शाळांची मुलींच्या संख्येनिहाय यादी सभापती देवराव भोंगळे यांनी वाचून दाखवली. पालकमंत्र्यांसह अन्य पाहुण्यांच्या हस्ते काही मुलींना सायकलीचे वाटप करुन वाटप कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)
मुलींनो खुप शिका, आईवडिलांचे नाव मोठे करा
By admin | Updated: July 25, 2016 01:14 IST