नकली फुलांची रोपटी विकणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:30+5:302021-09-05T04:31:30+5:30

विसापूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दोन-तीन दिवसांपासून काही लोक ट्युलिप, गुलजारा, जरबेरा, कमळ अशा नावाने काही रोपे मोठ्या ...

A gang selling fake flowers is active in the district | नकली फुलांची रोपटी विकणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय

नकली फुलांची रोपटी विकणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय

Next

विसापूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दोन-तीन दिवसांपासून काही लोक ट्युलिप, गुलजारा, जरबेरा, कमळ अशा नावाने काही रोपे मोठ्या प्रमाणावर विकत आहेत. ५० रुपयांस एक व १०० रुपयांना तीन अशी सेटची किंमत असून, या रोपांना विविध रंगी फुले येतात, असे सांगतात. वनस्पतीची खरी ओळख लपविण्यासाठी पाने पूर्णपणे कापून तिथल्या फांद्यांवर रंग लावलेले आहेत. अशी नकली फुलांची रोपटी विकणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

विशेषत: महिलांनी ही रोपटी विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. ही टोळी लोकांची शुद्ध फसवणूक करीत असून, ही जलपर्णी (इकॉर्निया)ची रोपे आहेत. काही ठिकाणी ही वनस्पती केंदाळ किंंवा जलकुंभी या स्थानिक नावानेही ओळखली जाते. या वनस्पतीला जांभळ्या रंगाची फुले येतात. तसेच मोठ्या नाल्यांमध्ये ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळून येते. जलप्रदूषणाला ही वनस्पती कारणीभूत ठरते.

रामाळा तलावामध्ये याच प्रकारातील वनस्पतीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले होते. अशा वनस्पतीमुळे ईरइ नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे व त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही होऊ शकतो. गोड्या पाण्याचे जलसाठे, नदी अथवा तलावांमध्ये ही वनस्पती वाढल्यास या वनस्पतीची वाढ थांबवणे खूप कठीण तर असतेच, शिवाय हे अतिशय खर्चीकही काम आहे. अनेक भागात दरवर्षी शासनाचा लाखो रुपये निधी या वनस्पतीच्या तात्पुरत्या सफाईसाठी खर्च होत असतो.

बॉक्स

ही रोपे घातकच

पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग या वनस्पतीमुळे पूर्णत: झाकला जातो. ज्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याखाली पोहोचू शकत नाही व पाण्यातील ऑक्सिजन ही वनस्पती मोठ्या प्रमाणात शोषून घेते. ज्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टी धोक्यात येते. म्हणून या वनस्पतीची रोपे कुणीही खरेदी करू नयेत, चुकून केल्यास हे रोप समूळ नष्ट करावे. आपल्या हलगर्जीपणामुळे अथवा चुकीमुळे ते निसर्गात पसरणार नाही याची काळजी घ्यावी.

कोट

मागील वर्षी अशा प्रकारची रोपटी खरेदी केली असता त्याला चक्क जांभळ्या रंगाची फुले आल्याने ती जलकुंभी (इकॉर्निया) वनस्पती असल्याचे लक्षात आले. तेव्हा आपली फसवणूक झाली, हे लक्षात आले.

- उमा विनायक काळे,

गृहिणी, विसापूर.

Web Title: A gang selling fake flowers is active in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.