डी.एड.केले : मात्र शोधला पर्यायी व्यवसायचंद्रपूर : २० वर्षांपूर्वी डी.एड. झाले की हमखास नोकरी, असे समीकरण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डी.एड.ला नंंबर लागला की, स्वर्ग दोन बोटे बाकी उरायचा. मात्र अलिकडच्या काळात खासगी अध्यापक विद्यालयाच्या सुळसुळाटामुळे डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौजच निर्माण झाली आहे. नोकरी मिळत नसल्याने आता भावी शिक्षक मिळेल ते काम करण्यात धन्यता मानत आहेत.२०-२५ वर्षांपूर्वी डी.एड. शिक्षकांना मोठ मान होता. शिक्षक होऊन ही मंडळी ज्ञानार्जनाचे काम करीत होती. काही वर्षांपासून खासगी संस्थांना शासनाने डी.एड. विद्यालयाची खिरापत वाटली. ठिकठिकाणी अध्यापक विद्यालय थाटल्या गेले. पूर्वी १२ वीत ७० टक्केहून अधिक गुण असले तरच डी.एड. ला नंबर लागायचा. मात्र खासगी अध्यापक विद्यालयामुळे कमी गुण असणाऱ्यांनाही डी.एड. मध्ये प्रवेश मिळू लागला. विद्यार्थी संंख्या कमी आणि अध्यापक विद्यालयात जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. आता तर अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थिती शेकडो तरुण डी.एड. होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही. अलीकडे डी.एड. झालेल्या तरुणांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली. गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी आता व्यवसाय स्वीकारले आहे. ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतीत राबतात. कुणी कुक्कटपालन करीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे शेती नाही, असे भावी शिक्षक अनेक ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. डी.एड. बेरोजगारांची ही अवस्था पाहून आता तरुणांनी डी.एड. कडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता अध्यापक विद्यालये बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. कधीकाळी नोकरीची हमखास हमी देणारी डी.एड. आता बेरोजगारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)
भावी शिक्षक झाले बेरोजगार
By admin | Updated: July 30, 2014 23:57 IST