बल्लारपूर : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहून शहरातील ४५ च्या वर असलेल्या नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी तालुक्यातील नऊ केंद्रावर गुरुवारी भेट दिली. परंतु कोरोना लस नसल्यामुळे त्यांना परत यावे लागले. फक्त बामणी आरोग्य केंद्रावर ४० जणांना लस देण्याचे सांगण्यात आले. बल्लारपूर शहरातील ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे इन्स्टिट्यूट, नाट्यगृह, बल्लारपूर मेडिकल असोसिएशन, वेकोलि रुग्णालय येथे जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणाची व्यवस्था केली होती. परंतु गुरुवारी सकाळी नागरिकांनी लसीकरण केंद्रास भेट दिली असता, लसीकरण केंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे केंद्र बंद असल्याची सूचना वाचून नागरिक घरी परतले. बामणी, कोठारी, विसापूर येथेही लसीकरण झाले नाही. यामुळे नागरिकांनी लस कधी येणार, अशी विचारणा प्रशासनाकडे केली आहे.
बल्लारपुरात लस केंद्रावर ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST