चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारपासून अधिकृत दारूविक्रीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १८९ दारूविक्री परवाने मंजूर करून विक्रेत्यांना प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे विदेशी दारूविक्रीचा ठोक परवाना (एफएल १) घेण्यासाठी एकही अर्ज आला नाही. देशी दारू ठोक (सीएल २) विक्री परवान्यांसाठी चार अर्ज प्राप्त झाले. मात्र, हा परवाना मंजुरीचे अंतिम अधिकार जिल्हास्तरावर नाही. त्यामुळे हे प्रस्ताव राज्य उत्पादन उत्पादक शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे रवाना करण्यात आले आहे.
गृह विभागाने ८ जून २०२१ च्या आदेशानुसान चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून नवीन परवाने व जुन्या परवान्यांचे नूतनीकरणाची प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक कार्यालयाकडून सुरू आहे. २ जुलै २०२१ रोजी मद्यविक्रीचे विविध प्रकारचे ९८ परवाने पुनर्प्रदान केले. त्यानंतर सोमवारी पुन्हा ९१ परवान्यांना मान्यता देण्यात आल्यानंतर त्याचदिवशी जिल्ह्यात दारू विक्रीला सुरुवात झाली. विदेशी ठोक दारू विक्रीचा परवाना घेण्यासाठी जिल्ह्यातून एकही अर्ज आला नाही. मात्र, देशी ठोक (सीएल २) विक्री परवान्यांसाठी राज्य उत्पादन शु्ल्क अधीक्षक कार्यालयात चार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हास्तरावर नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे (मुंबई) पाठविण्यात आले आहेत.
आतापर्यंत पुनर्प्रदान केलेले दारू विक्री परवाने
एफएल २ (वाईन शॉप) -०१
एफएल ३ (परमिट रूम) -१३२
एफएल ४ (क्लब परवाना ) -०१
एफएलबीआर (बीअर शॉपी) -१४
सीएल २( देशी दुकान ) -४१
एकूण -१८९