लोकमत न्यूज नेटवर्कमूल : २० मे रोजी तालुक्यातील केळझर येथील एका तीन वर्षीय मुलीसह तिच्या आईचे अपहरण केलेल्या वनरक्षकाचा शोध घेण्यास मूल पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. विशाल मंत्रीवार असे अपहरण केलेल्या वनरक्षकाचे नाव असून तो वनरक्षक पदोन्नती वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याच्या बचावासाठी वनविभागतील काही वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.मूल तालुक्यातील केळझर येथील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या डेंकापूरवार यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तीन वर्षीय मुलीसह पत्नीचे केळझर येथील रेल्वे स्थानकावरुन वनरक्षक विशाल मंत्रीवार यांनी २० मे रोजी चारचाकी वाहनाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे मूल पोलिसांनी विशाल मंत्रीवार यांच्याविरुद्ध कलम ३६३ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेला १९ दिवस लोटून गेलेले असतानाही वनरक्षक विशाल मंत्रीवार यांचा शोध घेण्यात मूल पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कुमरे करीत आहे. मंत्रीवार यांच्या शोधात मूल पोलीस फिरत आहे. मात्र अद्याप तरी त्यांना यश आले नाही. या प्रकरणातून विशाल मंत्रीवार यांची सहीसलामत सुटका व्हावी यासाठी वनविभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट सक्रीय झाला आहे. मंत्रीवार यांनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र अजुनपर्यंत जामीन मंजूर झालेला नाही.
अपहरण प्रकरणातील वनरक्षक अद्यापही फरारच
By admin | Updated: June 9, 2017 00:57 IST