माणिकगड किल्ला : पर्यटकांची गर्दी, विद्यार्थ्यांच्या सहली शंकर चव्हाण जीवती हिरव्यागार वृक्षांनी नटलेल्या पर्वतरांगा, धुक्याची मंद झालर, वृक्षाच्या झरोक्यातून निघणारी सूर्याची कोवळी किरणे, नागमोडी वळणावरून ये-जा करणारी वाहने आणि पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडणारा अमलनाला तलाव. अशा रमणीय स्थळी असलेल्या माणिकगड किल्याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष देऊन पर्यटकांच्या दृष्टीने किल्ल्याची देखभाल व दुरूस्ती करून किल्ला आकर्षक बनविले असून वनविभागाने सुध्दा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या विसाव्यासाठी दोन ठिकाणी झक्कास ‘पगोडा’ तयार करून किल्ल्याच्या सांैदर्यांत भर टाकली आहे गडचांदूर-जीवती या मार्गांवर माणिकगड किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी विष्णुचे मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. दरवर्षी याठिकाणी हरिणाम सप्ताहाचे सुध्दा भाविक आयोजन करतात. या निसर्गरम्य माणिकगड किल्ल्यावर भाविक, पर्यटक व अभ्यासकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. किल्ल्यावर असलेल्या पुरातन वास्तु नैसर्गिक वनस्पतीने नटलेल्या डोंगराळ परीसर आणि नागमोडी वळणावरून येणारे पर्यटक भर ऊन्हांतही आनंद घेताना दिसतात. देश-प्रदेशातून पर्यटक, भाविक, अभ्यासकांचा यात समावेश असतो. सण-उत्सव व सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठी वर्दळ पाहायला मिळते. शाळेच्या सहली सुध्दा येतात. किल्ल्याच्या परिसरात आनंद घेताना पर्यटक व विध्यार्थी थकून जातात. अशावेळी पर्यटक व विध्यार्थी झाडाचा आसरा घेताना दिसतात. ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूरचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी संयुक्त वनव्यवस्थापनाच्या माध्यमातून जिवतीचे वनपरिक्षेञ अधिकारी ज्ञानोबा अडकिणे व वनरक्षक नरेंद्र देशकर यांच्या देखरेखीखाली आकर्षक असे दोन ‘पगोडा’ तयार करून पर्यटकांच्या विसाव्यासाठी सज्ज केले आहे. विशेष म्हणजे पगोडा तयार करण्यासाठी संपूर्ण लाखडी फळीचा वापर केला गेला आहे. त्यावर दिलेला शोभणीय रंग आणि कौसल्यपुर्ण कामामुळे हे पगोडा आकर्षक दिसत असून ही कामे करण्यासाठी कारागिरांना महिनाभराचा कालावधी लागला आहे. पर्यटकांना हवी निवासाची सोय निसर्ग सौंदर्य किल्ल्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व अभ्यासकांना वनविभागाने निवासाची सोय करून दिल्यास नक्कीच पर्यटक व अभ्यासकांच्या संख्खेत वाढ होईल. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी लाकडी खेळणी किल्ल्यावर सहलीला येणाऱ्या विध्यार्थांना निसर्ग सौंदर्याच्या आनंदाबरोबरच खेळाचाही आनंद घेता यावा यासाठी विविध खेळ खेळण्यासाठी लाकडाची खेळणी तयार करण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आनंद घेताना दिसतात. किल्ल्यावर पगोडा आणि खेळणी तयार झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येती.
पर्यटकांच्या विसाव्यासाठी वनविभागाने बांधला झक्कास ‘पगोडा’
By admin | Updated: March 22, 2017 00:49 IST