साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कर्मचाऱ्यांनी विदेश दौऱ्यावर जाताना संबंधित विभागप्रमुखांची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत पाच शिक्षकांनी प्रशासनाची परवानगी न घेताच विदेश दौरा केल्यामुळे या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेत आला. त्यामुळे परवानगी न घेता विदेश दौरा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले मूल, सावली तालुक्यातील प्रत्येकी एक आणि राजुरा तालुक्यातील तीन अशा एकूण पाच शिक्षकांनी नुकताच विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यासाठी त्यांचे खासगी काम असण्याची शक्यता आहे. मात्र आपला देश सोडून जाताना ज्या विभागात आपण कार्यरत आहोत. त्या विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र या शिक्षकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण समितीच्या सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी उत्तर देताना यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आली नसल्यामुळे या शिक्षकांची चौकशी करण्यात आली नसल्याचे उत्तर दिले. यामुळे मात्र सदस्य आणखीच आक्रमक झाले असून आता थेट सीईओंकडेच याबाबत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, भद्रावती तालुक्यातीलही काही शिक्षक विदेशात गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या तरी केलेला विदेश दौरा शिक्षकांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे काय? - चिमूर तालुक्यातील एका शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर वन विभागाने गुन्हा दाखल केल्याबाबत शिक्षण समितीमध्ये विषय चर्चेत आला. या अधिकाऱ्यावर शिक्षण विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न शिक्षण समिती सदस्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे तक्रार आली नसल्याचे सांगून शिक्षणाधिकारी मोकळे झाले. मात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.
विदेश दौरा करीत असतानाही संबंधित विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, जिल्ह्यातील काही शिक्षकांनी विदेश दौरा केला असतानाही त्यांनी परवानगी घेतली नाही. यापूर्वी एका शिक्षकाने असाच दौरा केला त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांना सूट कशी, हा प्रश्न आहे. यासंदर्भात शिक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. आता सीईओंकडे तक्रार दाखल करणार आहे.- पृथ्वीराज अवताळे, जि.प.सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य