लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात टेस्टिंग लॅब, मूल येथे लॉजिस्टिक हब तसेच बँक ऑफ इंडिया चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उद्योगांच्या आढावा बैठकीत देण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उद्योगांना चालना, स्थानिकांना रोजगार व अडीअडचणी समजून घेणे तसेच 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत निर्यात धोरण निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक सुर्या, केंद्राचे ऋतुराज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात सर्व उद्योगांनी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
याबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. कंत्राटदारांकडून भरती प्रक्रिया होत असल्यास संबंधित कंत्राटदाराने या नियमाचे तंतोतंत पालन करावे. स्थानिक लोकांना रोजगार पुरविण्यासंदर्भातील वार्षिक महाव्यवस्थापक अहवाल यांच्याकडे सादर करावा. उद्योगांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू आहे. उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन केले.
गतवर्षी निर्यातीत २० टक्क्यांची वाढ
- जिल्ह्यातील गतवर्षी २० टक्क्यांनी वाढलेली निर्यात व यावर्षी निर्यात वाढीकरिता उपाययोजना करणे, 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत तांदूळ व बांबू प्राधान्याने निर्यातीबाबत आढावा घेण्यात आला.
- चंद्रपूरमध्ये टेस्टिंग लॅब, मूल येथे लॉजिस्टिक हब तसेच बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील निर्यात वाढीकरिता या बाबी फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्या यांनी बैठकीत सांगितले.