देवाडा (खुर्द) : पोंभूर्णा तालुक्यात अद्यापही एकही उद्योग नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज उभी आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने ते अवैध मार्गाने पैसा कमविण्याच्या मार्गाने लागण्याची शक्यता आहे. शासनाने आता तरी या तालुक्यात रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.पोंभुर्णा तालुक्याची लोकसंख्या ५० हजार ७८१ आहे. दरवर्षी ११ माध्यमिक शाळा, महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. कनिष्ठ महाविद्यालयातूनही विद्यार्थी पुढील शिक्षण घेतात. आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. पदविधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारींच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील बेरोजगारांना पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी फार कमी प्रमाणात नोकरी मिळाली आहे. डी.एड. बी.एड. बिपीएड, एम.ए., एम.एड शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा ते स्वयंनिर्भर व्हावे यासाठी शासनाने काही योजना सुरु केल्या. परंतु तालुक्यात या योजनांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेतून वृद्धांना महिन्याकाठी अर्थसहाय्य मिळते. परंतु लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करूनही युवकांना बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. तालुक्यात अद्यापही युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकली नाही. कोणते कामे करावे असा प्रश्न या युवकांना पडला आहे.पोंभुर्णा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३० हजार ९८४ हेक्टर आहे. ३२ ग्रामपंचायती असून ७१ गावांचा समावेश आहे. तालुका निर्मीतीला १५ वर्षाचा काळ लोटला. या आदिवासी बहुल मागास तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने परिसरातील बेरोजगारांना मिळेल ते काम करून जगावे लागत आहे. तालुक्यामध्ये वैनगंगा व अंधारी या नद्यांचे स्त्रोत लाभले आहे. या नद्यांच्या पाण्यावर एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकाच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्वाचे आहे. लघु उद्योग मंडळाकडून लघू उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक परिसरातील बेरोजगार युवकांकडून होत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हा तालुका मागासलेला आहे. केवळ धानशेतीवर अनेक शेतकरी अवलंबून आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे. त्यामुळे तालुक्यात एमआयडीसी अंतर्गत उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
पोंभुर्णा तालुक्यात बेरोजगारांची फौज
By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST