चंद्रपूर : मकरसंक्रांतीनिमित्त बालकांपासून मोठ्यापर्यंत बहुतांशजण पतंग उडवितात. मात्र अनवधानाने अपघात होतो. नायलाॅन मांजा वापरल्यामुळे अनेक पक्ष्यांचा जीव जातो. त्यामुळे पतंग उडविण्याचा आनंद पर्यावरणाचे संरक्षण, स्वत:सह समाजाचे रक्षण करूनच घ्या, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनानेही नायलाॅन मांजावर बंदी घातली असून कारवाईसाठी पथकाचे गठण करण्यात आले आहे. संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदाने पतंग उडवितात. त्यामुळे पतंग आणि मांजाची दुकाने सजली आहेत. दरम्यान, उंच-उंच रंगीबेरंगी पतंगबाजीही केली जात आहे. या आनंदाेत्सवात विघ्न येऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: उच्च व लघू दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर तसेच वीजतारांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये वीज वितरणच्या लघू व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरले आहे. अनेकवेळा पतंग उडविताना किंवा कटलेली पतंग विजेच्या तारांवर, खांबावर अडकते. अडकलेली पतंग काठ्या, लोखंडी सळाख आदींच्या माध्यमातून काढण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. अशावेळी जिवंत तारेला स्पर्श होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अनेकवेळा अडकलेला पतंगाचा मांजा लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात दोन तारांचा स्पर्श होऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे वीजवाहिन्यांच्या परिसरात नागरिकांनी, लहान मुलांनी पतंग उडवू नये, त्याऐवजी सुरक्षित स्थळी पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.