गोवरी : पाणी म्हणजे जीवन आहे. एखाद्यावेळी तहानेने व्याकूळ झाल्यास पाण्याची महिमा कळून येते . मात्र चिंचोली (खुर्द) गावातील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथील नागरिकांना नाईलाजाने असे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र गावात दिसून येत आहे.राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) पूर्वीपासूनच तसे दुर्लक्षित गाव. मात्र चिंचोलीसारख्या गावात शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व पदवीच्या शिक्षणाची सोय झाल्याने बाहेरील विद्यार्थी शिक्षणासाठी गावात येऊ लागले. त्यामुळे गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष लोटूनही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यामुळे येथील अनेक नागरिकांना साधेदुखी, कमरेचे आजार तर शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांचे दात पाण्यामुळे पिवळे पडले आहेत.गावात विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे सरकारी हातपंंपांवर गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. गावात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता जलशुद्धीकरणाची एक टाकी गावातील शासकीय हातपंपाजवळ बसविण्यात आली आहे. मात्र त्या टाकीची दूरवस्था झाल्याने शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. २०१० मध्ये या गावात तापाची साथ आल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या गावाला भेट दिल्याने चिंचोली हे गाव अधिकच प्रकाशझोतात आले होते. गावातील दूषित पाणी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे तापाची साथ आल्याचे स्पष्ट झाले.गावातील फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गावकऱ्यांचे आयुष्य करपत चालले असून अजूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे आजही चिंचोली येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मात्र यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे शासकीय यंत्रणा पांगळी झाली आहे. (वार्ताहर)
फ्लोराईडयुक्त पाण्यावर भागते तहान
By admin | Updated: May 10, 2015 01:06 IST