अशी असते गर्दा पावडरची नशा
२०० रुपयांमध्ये गर्द पावडरची चिमूटभर पुडी मिळते. प्लॅस्टिकच्या पन्नीवर सुईच्या टोकाएवढी पावडर टाकून पन्नीला आग लावून त्यातून निघणारा धूर नाकाद्वारे घेऊन ही नशा केली जाते. याचे प्रमाण वाढत जाते. ही नशा तब्बल दोन दिवस उतरत नाही. दारूपेक्षाही ही नशा स्वस्त असल्यामुळे तरुणवर्ग व शाळकरी मुले याच्या आहारी जात आहेत. पाच वर्षात ४० तर वर्षभरात २० कारवाया या संदर्भात चंद्रपूर पोलिसांनी केल्या आहेत.
चंद्रपूरचे नागपूर व तेलंगणा कनेक्शन
चंद्रपूर जिल्ह्यात ड्रग्जला समांतर असलेले हे अमली पदार्थ तेलंगणा राज्यातून येत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. आतापर्यंत झालेल्या बहुतांश कारवायांमध्ये जप्त केलेले अमली पदार्थ तेलंगणातून आलेले असल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे. नागपुरातूनही हे अमली पदार्थ येत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
२० ते ३० वर्षाच्या वयातील सुमारे १५ टक्के रुग्ण हे गांजा व गर्द पावडर, डुडा भुकटीने ॲडिक्ट झालेले असतात. ही नशा करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून दारूसारखा वास येत नाही. झिंगत नाही. म्हणून ही नशा करणारी व्यक्ती लक्षात येत नाहीत. थेट मेंदूवर आघात करणारी ही नशा आहे. रुग्णाला यातून बाहेर काढण्यासाठी उपचार केला जातो. यातून बरे होताच त्यांचे समुपदेशन केले जातात. ड्रग्ज महागडे असल्यामुळे हे अमली पदार्थ घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे येणाऱ्या रुग्णांवरून दिसून येते. अनेकजण तक्रारी करीत नसल्याने हा प्रकार वाढतो आहे.
- डाॅ. किरण देशपांडे, मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर.