चंद्रपूर : श्री कन्यका नागरी सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत २ हजार १२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी रविवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून सुरू झाली. निकालाअंती सहकार पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.प्रथम मोजणी इतर मागासवर्ग प्रवर्गाची झाली. त्यात गणेश श्रावणजी आदमने यांना १५३८ मते पडली. तसेच राजेश डाह्याभाई पटेल यांना ४७१ मते पडली. सहकार पॅनेलचे गणेश आदमने निवडून आले. सर्वसाधारण मतदार संघातून सहकार पॅनेलची १० उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत.त्यात विजय आईंचवार(१८४६), डॉ. प्रफुल भास्करवार (१७९४), दीपक गुंडावार (१७९५), बंडोपंत कुल्लुरवार- (१७८३), राजीव गोलीवार (१७९८), संतोष चिल्लरवार (१८०१), सुमेध कोतपल्लीवार (१८२१) जयंत बोनगीरवार (१७५७), सुभाष कासनगोट्टूवार (१८५४), प्रदीप भिमनवार (१७३२) यांचा समावेश आहे. हे सर्व दहाही उमेदवार बहुमतांनी निवडून आले. निशांत गौरशेट्टीवार यांना २४० मते पडली आणि अनिल उपलंचीवार यांना ३०३ मते पडली. सहकार पॅनलला मतदारांनी स्विकारले. सहकार पॅनेलचे यापूर्वीच चार उमेदवार अविरोध निवडून आले. त्यात महिला मतदार संघातून वसुधा कंचर्लावार, प्रतीक्षा बिरेवार, अनुसूचित जाती-जमातीमधून किशोर जोरगेवार आणि भटक्या जाती विमुक्ती जमाती विशेष मागास प्रवर्गातून उमेश नानाजी वासलवार यांचा समावेश आहे. बँकेचा विकासाच्या दृष्टीने विजय आईंचवार आणि डॉ. प्रफुल्ल भास्करवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संचालक मंडळ कार्य करेल, असा विश्वास विजयानंतर व्यक्त करण्यात आला. निवडणुकीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी काम केले, त्यांचे विजयी उमेदवारांनी आभार व्यक्त केले तसेच ना.सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानण्यात आले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था आणि त्यांचे सहकारी यांचेही आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
श्री कन्यका नागरी सहकारी बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:42 IST