शहीद अशफाक उल्लाह जयंती कार्यक्रम : विविध विषयांवर झाले मार्गदर्शनबल्लारपूर : सामाजिक तसेच आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमधील पाच जणांचा सत्कार येथील शहिद अश्फाकखान मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटीद्वारे सोमवारी करण्यात आला. शहीद अश्फाक उल्लाह खान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी हाजी शफीक अहमद हे होते.राजुरा तालुक्यातील बीबी येथील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ.गिरीधर लटारी काळे, इको-प्रोचे पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे, लोकमतचे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर, गोंडवाना विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग शाखेचे डीन प्रा.डॉ.जाफर जावेद खान, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष तसेच व्यापारी जैनुल आबेदिन ऊर्फ बाबाभाई या पाच जणांचा शफीक अहमद यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त करीत काही अनुभव कथन केले. युवकांनी समाज कार्यात पुढे येण्याचे तद्वतच आपण ज्या भागात राहतो. त्या भागाचा इतिहास जाणून घ्या, वास्तूंचे अवलोकन करा, असे आवाहन युवकांना केले.बंडू धोतरे यांच्या कार्याची ध्वनिफीत दाखविण्यात आली. शफिक अहमद यांनी सोसायटीच्या या उपक्रमाची प्रशंसा करीत समाजातील बंधुभाव वृद्धिंगत करण्याकरिता असे कार्यक्रम नित्य घेणे गरजेचे असल्याचे म्हणाले. प्रास्ताविक भाषणात या संस्थेचे अध्यक्ष शरीफ गुरुजी यांनी १९२० च्या काळात स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद अश्फाक उल्लाह खान यांच्यासोबत माहिती सांगत, सत्कारामागची भूमिका मांडली. महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद लोणारे यांचेही प्रासंगिक भाषण झाले. संचालन नासिर खान यांनी तर आभार प्रदर्शन अब्दुल सलिम यांनी केले. मो.गयास, अॅड.नाजीम खान, सैय्यद आसिफ, भुरूभाई, सैफुल्लाह बेग, सलमान खान, मो. आतिक, सै. अथहर अली, सोहेल खान, रियाज भाई, राजू मजगवळी, मधुसूदन राव, समीर खान, रमीज अहमद, देवीदास धानोरकर आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
विविध क्षेत्रातील पाच जणांचा सत्कार
By admin | Updated: October 29, 2015 01:28 IST