प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : लोखंडाविना दगडांनी बांधला बंधाराचंद्रपूर : एखाद्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांचेही हात काळे झाले की, त्या प्रकरणाची वासलात कशी लावली जाते, याची अनुभूती सावली तालुक्यातील सायखेडा येथील गावकरी घेत आहे. सायखेडा गावालगत बंधारा बांधताना त्यात लोखंडाचा वापरच करण्यात आला नाही. केवळ दगडांचा वापर करून हा बंधारा तयार करण्यात आला. याची तक्रार होऊन आज अनेक वर्षे लोटली; परंतु आजवर कोणतीही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मार्च २०१० मध्ये सायखेडा गावालगत भानुदास वाघरे यांच्या शेतालगतच्या पाच लाख रुपये किंमतीच्या नाल्यावर सिमेंट प्लग बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये ग्रामपंचायतीच्या मार्फतीने बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात ककरण्यात आली. हे काम करताना बंधाऱ्यात मोठ-मोठे दगड भरण्यात आले. विशेष म्हणजे तेथेच बांधून असलेल्या कच्चा बंधाऱ्यातील दगड व मातीचा या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी सर्रास वापर करण्यात आला. यासंदर्भात सायखेडा येथील रहिवासी खुशाल लोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये याच विषयात लोडे यांनी तत्कालिन जलसंपदा मंत्र्यांकडेदेखील तक्रार केली. मात्र तक्रारींची चौकशीच करण्यात आली नाही. मात्र तरीही जिल्हा परिषद सिंचन विभागातील दोन अधिकाऱ्यांनी या कामाचे बिल अदा केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.दरम्यान या बंधाऱ्याविषयी वारंवार तक्रारी होत असल्याची बाब लक्षात घेऊन विद्यमान कार्यकारी अभियंता सहारे यांनी स्वत: ३० सप्टेंबर रोजी या बंधाऱ्याची पाहणी केली. तेव्हा बंधाऱ्याला मोठमोठ्या भेगा पडलेल्या दिसून आल्यात. या बंधाऱ्यावर पाट्या नसून स्लॅबचे मजबुतीकरणदेखील झाले नाही. या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे या बंधाऱ्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)