मदतही नाही : पितृछत्र हरपलेल्या अंकुशवर आई-बहिणींची जबाबदारीरत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील वडगाव येथे वीज पडून सहा जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. यातील राजू गेडाम या मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबावर ओढविलेला जगण्यासाठीचा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे.मृत राजूला दोन पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा संपुर्ण भार बारावीत असलेल्या अंकुशवर पडला आहे. पंधरा वर्षापूर्वी राजुरा तालुक्यातील मंगी या गावावरून हे कुटुंब कामासाठी वडगाव येथे स्थलांतरित झाले. मृत राजुला ट्रॅक्टर चालविण्याचे व शेती कामाचे चांगले कौशल्य असल्याने वडगावात त्याला काम मिळू लागले. या खरीप हंगामात त्याचा शेतात जाण्याचा हा पहिलाच दिवस होतो. ज्या दिवशी आकाशात अचानक ढग गोळा होऊन वीज चमकू लागली वीज कोसळून तो जागी ठार झाला. पहिला पाऊस, पहिला शेतातील दिवस त्याच्यासाठी व कुटुंबास कर्दनकाळ ठरला आहे. अंकुशच्या शिक्षणासह इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी बहिण रिना व इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कविताचा भार त्याला पेलावा लागणार आहे. राजू गेडाम यांचे नाव बीपीएल यादीत आहे.परंतु अद्याप त्यांना घरकुल मिळालेले नाही. गावातील नविन वस्तीतील जागेवर लाकूड फाटे, बांबुचे ताखे आणि कवेलू, पत्रे टाकून कुटुंब राहत आहे. येणाऱ्या दिवाळीला घरावर छत टाकून राहण्यापुरते घर तयार करण्याचे मृत राजूचे स्वप्न असल्याचे पत्नीने सांगितले. मात्र आता घरातील मुळ कर्णधार गेल्याने जगायचे कसे, असा प्रश्न घरच्यांसमोर निर्माण झाला आहे. घराचा संपुर्ण भार पेलावा लागणार असल्याने शिक्षणासाठी अंकुशला मोठी कसरत करावी लागणार आहे. मुळगावी वडिलांच्या नावे शेती नाही. कुठलाही बँक बॅलेन्स अथवा घराची जागा तेवढीच मालमत्ता असल्याचे अंकुशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या कुटुंबाचा आधारवड हिरावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेतील इतर पाच मृतांची परिस्थिती अशीच आहे. एकाला लग्नाआधीच प्राण सोडावा लागला तर एकाचा चार महिन्यातच बाळ आणि पत्नीला सोडून असे जावे लागले.वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या या सहा जणांच्या घरातील चित्र मन हेलावणारे आहे. या घटनेनंतर स्थानिक आमदार, माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेटी देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप मदत नाही. तेव्हा शासन काय मदत करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतीचा पहिला दिवसच कर्दनकाळ
By admin | Updated: June 14, 2015 01:55 IST