शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

By admin | Published: December 6, 2015 12:54 AM2015-12-06T00:54:34+5:302015-12-06T00:54:34+5:30

शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते.

Fire test for the price hike | शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

शेतमालाच्या दरवाढीसाठी अग्निपरीक्षा

Next

शेतकरी हवालदिल : हिवाळी अधिवेशनाकडे साऱ्यांचेच लक्ष
प्रकाश काळे गोवरी
शेतमालाला आज ना उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते. अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात शेतमाल विकून आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला असताना पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अजूनही कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. त्यामुळे शेतकरी पार होरपळून गेला असून हिवाळी अधिवेशनात कोणते लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या किती पोटतिडकीने मांडतो, हेच पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील असा तमाम शेतकऱ्यांनी बांधलेला अंदाज आजवर झालेल्या हिवाळी अधिवेशनांनी खोटा ठरविला आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे शेतमालाच्या दरवाढीचा शेवटचा टप्पा असतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे शेतकरी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात. देशातला शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व्यवस्थेच्या कणाच पार कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट आहेत. दिवसरात्र शेतात काबाडकट करुनही शेतकऱ्यांच्या हातात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी आजवर हालअपेष्टांचे जिणे आले आहे. मात्र त्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत कायमस्वरुपी उपाय शोधता आला नाही. हे आज विविध शिखर पादाक्रांत करणाऱ्या आपल्या देशाचे सर्वात मोठे दुदैव असल्याच्या प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.
दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजला आहे. यावर्षी निसर्गानेही दगा दिला. मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतमालाच्या दरवाढीकडे पाठ फिरविल्याने उत्पादन खर्च अधिक आणि उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करुन शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीही हमी शेतकऱ्यांजवळ नाही. दिवसरात्रं कष्ट उपसून निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारेही कोणी पुढे येत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज फेडून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना दिवसरात्रं छळतो आहे.
विदर्भाची सुपीक माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांना त्याची बाजू भक्कम करणारे ठरतात. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारचे शेतकऱ्यांविरोधी धोरण यामुळे शेतीला अवकळा आली आहे. परिणामी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतमालाला दर कमी आणि उत्पादन खर्च अधिक होत असल्याने शंभराचे साठ अन् गळ्याला फास अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.

Web Title: Fire test for the price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.