चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण व सहभागाचा पद्धतशिर कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने मतदारांना माहिती, प्रोत्साहन व सुविधा पुरविल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास स्वीपचे निरीक्षक कृपाशंकर यादव यांनी व्यक्त केला. प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, स्वीपचे नोडल आॅफिसर सुरेश वानखेडे तथा सदस्य यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे व आयोगाचा उद्देश असून त्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल आहे. लोकांना मतदानासाठी जागृत करणे, प्रोत्साहित करणे व सुविधा पुरविणे या बाबी केल्यास मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयात मॉक पोल घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदार याद्या लावण्याचे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात ८ आॅक्टोबरपर्यंत मतदार चिठ्ठीची (पोलींग चिट) पोहचविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शहरी भाागात कमी मतदार झाल्याचे निर्देशनास आल्याचे सांगून ८४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यापेक्षा कमी मतदार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. गैरहजर किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारामुळेसुद्धा टक्केवारीवर परिणाम झाला असून अशा मतदारांची यादी वेगळ्याने तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक दिवस मतदारांच्या सुविधेसाठी याद्या लावण्यात येणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी मोबाईल मतदार सुविधा केंद्र प्रत्येक तालुक्यासाठी तयार करण्यात आले असून यात लॅपटापवर मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. लोकसभेमध्ये जास्त मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला होता. विधानसभेसाठीही जास्त मतदान करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येणार असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनाही पुरस्कृत करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.लोकसभेत जास्त मतदान करणाऱ्या स्पर्धेत प्रथम आलेल्या नागलोन ता.भद्रावती, द्वितीय भालेश्वर ता. ब्रह्मपुरी, तृतीय सोनुर्ली ता. राजुरा सर्वाधिक महिला मतदान स्पर्धेत प्रथम साखरी ता. राजुरा, भालेश्वर, पाचगाव ता. ब्रह्मपुरी या गावाच्या सरपंच व ग्राम सचिवाचा यावेळी सत्कार करण्ययात आला. मतदान जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, सहकार विभाग व नेहरु युवा केंद्राने आराखडा बनविला असून या आराखड्याचे सादरीकरण स्वीप निरीक्षक यांच्यासमोर करण्यात आले. सकाळच्या सत्रात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. (शहर प्रतिनिधी)
सुविधांवर भर द्या, टक्केवारी नक्की वाढेल
By admin | Updated: October 4, 2014 23:24 IST