वरोरा : तालुक्यातील २७ गावांमधील शेतकऱ्यांनी दुबार पिकासाठी आपल्या शेतजमिनी १५ दिवसांपूर्वीच तयार केल्या; परंतु कालव्यातून पाणी मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुबार पीक घेण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी वरोरा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. वरोरा तालुक्यातील २७ गावांतील शेतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील लाल व पोथरा धरणाच्या ेकालव्यातून सिंचन केले जाते. यावर्षी सोयाबीन पीक निघाल्याने शेतकऱ्यांनी दुबार पिकासाठी शेतजमीन तयार करून ठेवल्या आहेत. १५ दिवसांपासून शेतकरी कालव्यामध्ये पाणी सोडण्याबाबत संबंधीत विभागाला विनंती करीत आहेत. परंतु शेतकऱ्यांना समर्पक उत्तरे मिळत नाही. यावर्षी कालवे सल्लागार समितीची बैठकही घेण्यात आली नाही तर पाणी सोडण्याबाबतचे जाहीर प्रकटनही करण्यात आले नाही. त्यामुळे दुबार पीक घेण्यासाठी पाणी मिळणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी लाल-पोथरा संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्वात २७ गावांतील शेतकऱ्यांनी वरोरा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच कालव्यासाठी जमिनी घेतल्या त्यांचा मोबदला देण्यात आला नाही. त्या जमिनीचे सातबाराही वेगळे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना उर्वरित जमीन विकायची असल्यास किंवा शेतात बोअरिंग, विहीर खोदकाम करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात परवानगीसाठी येरझरा घालाव्या लागतात. या मागण्या संदर्भात मागील दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरवर्षी पाणी सोडताना पाटबंधारे विभागाकडून विलंब केला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक येवून चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
सिंचनाच्या पाण्यासाठी वरोऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: November 1, 2014 22:49 IST