कडा करपा, मावा तुडतुड्याने ग्रासले : हजारो हेक्टरमधील धान सुकलाचंद्रपूर : पाऊस चांगला पडल्याने अधिक धान पिकतील या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मावा तुडतुडा आणि कडा करपाने ग्रासले आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर धान पीकच या रोगाने नष्ट झाल्याने शेतकरी बेहाल झाला आहे. निसर्गामुळे कोलमडलेल्या या शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्तवात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. चक्क त्यांच्या कार्यालयात जावून धानाच्या पेंड्या त्यांना दाखविल्या आणि मदतीची मागणी केली.मागील दोन दिवसांपासून आमदार विजय वडेट्टीवार यांनी मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. सावली तालुक्यातील नऊ गावांमध्ये जावून शेतातील धान पिकाची पहाणी केली. मावा आणि तुडतुड्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिक नष्ट झाल्याचे यावेळी निदर्शास आले. तर धान पिकावर कडा करपा रोग पडल्याने निवसण्याच्या तयारी असलेला धान पूर्णत: सुकून गेल्याचे पहाण्यात आले. शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा धान पिकांवर रोग आल्याने हे शेतकरी कोलमडले आहेत. अधिक प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतातील धान मृतप्राय झाला आहे. त्यामुळे हवालदील झालेल्या सुमारे २०० शेतकऱ्यांना घेऊन आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र प्रशासनाला शेतकरी येणार असल्याची कसलीही कल्पना नव्हती. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कक्षालगतच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. शेतकऱ्यांसह आमदार आल्याचे कळताच एकच धावपळ उडाली. अखेर बैठक थांबवून आशुतोष सलील यांनी शेतकऱ्यांना आत बोलावून घेतले. सुकलेले धान, करपलेल्या पेंडा, आणि दाणा न भरलेल्या ओंब्या पाहून जिल्हाधिकारीही स्तब्ध झाले. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष देवून एकरी २० हजार रूपयांची मदत द्यावी. खरिप हंगामात सावली तालुक्यातील २४ हजार ९१४ हेक्टर, ब्रह्मपुरीतील २८ हजार ९० हेक्टर, सिंदेवाहीतील १८ हजार ७२५ धान पिकाला बसल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र युवक कांग्रेस अध्यक्ष शिवा राव, दिनेश चोखारे, रजनी हजारे तसेच शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)पंधराशे कोटींच्या विम्याचा लाभच नाहीया वेळी पत्रकारांशी बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पंतप्रधान पीक विमा योजना बिनकामाची आहे. राज्य सरकारने यासाठी एक हजार ५४० कोटी रूपये रिलायंस कंपनीमार्फत भरून विमा उतरविला आहे. मात्र ६५ टक्के व त्यापेक्षा अधिक पाऊल पडला असल्यास मदत मिळणार नाही, अशी तरतुद आहे. मात्र शेतकऱ्यानां हे माहीत नसल्याने मोठी फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारची ही योजना असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुकलेल्या धानाच्या पेंड्यांसह शेतकरी धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:46 IST