चंद्रपूर : दिवाळीपूर्वी कापसाची विक्री करून शेतकरी रबीच्या तयारीला लागत होते. मात्र यावर्षी वरुणराजाच्या वक्रदृष्टीने शेतकऱ्यांना यंदा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कापूस संकलन केंद्र अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरीच आहे. रबीची तयारी म्हटले की, पुन्हा पैसे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी बँक, सावकारांच्या घरच्या चकरा मारत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस दिवाळीपूर्वीपासून निघून घरी पडलेला आहे. कापूस संकलन केंद्र सुरू न झाल्ळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे दिवाळी अंधारात गेली. रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी बियाणे घ्यायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे तातडीने कापूस संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरोरा विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी केली आहे.शेतकरी आपली जमापुंजी लावून शेतात राबराव राबतो. पीक घेतो पण, ते पीक विकायची वेळ आल्यावर सरकार खरेदी केंद्र सुरू करीत नाही. परिणामी दिवाळी पूर्वीपासून कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडला आहे. पैसे हातात न आल्यामुळे यावेळी बाजारही थंंडाच होता. याचा परिणाम व्यापारावही झाला. अनेकांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली. जनतेच्या अपेक्षा घेऊन नवीन सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेच्या जल्लोषात व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
रबीसाठी शेतकरी सावकाराच्या दारी
By admin | Updated: November 8, 2014 01:05 IST