छायाचित्र
मासळ (बु.) : यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने एकही शेत पाणंद रस्ता दुरुस्त, तर सोडा खडीकरणही केला नाही. जुलै महिन्यात लागून पडलेल्या पावसामुळे शेतपांदण रस्ता चिखलयुक्त झाला आहे. चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसारख्या अक्षरश: उड्या मारून शेतात जावे लागते. शेती हंगामासंदर्भात आगेकूच करणारा शेतकरी चिखलयुक्त रस्त्यामुळे चिंतातूर झाला आहे. अनेक गावांतील शिवारात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचा हा वनवास केव्हा संपणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
चिमूर तालुक्यातील मासळ परिसरातील मासळ (बु.), नंदारा, मासळ तुकुम, मानेमोहाळी, कोलारा तुकुम, टेकेपार, सातारा, मदनापूर, करबडा, चैती तुकुम, विहीरगाव आदी गावांतील शेतपाणंद रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहेत. ऐन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बी-बियाणे, खते शेतातील झोपडीत नेऊन ठेवतो. मात्र शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्यांना उत्पन्न घरात येईपर्यंत याच चिखलमय पाणंद रस्त्यांवरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासन, प्रशासन विविध प्रकारच्या योजना राबविते; मात्र ग्रामीण भागात योजनांची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.
बाॅक्स
पायी चालणे अवघड, बैलबंडी कशी जाणार?
हल्ली पावसात पाणंद रस्त्यात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. मग या मार्गाने बैलबंडी, शेतीपयोगी साहित्य कसे नेता येणार, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक गावांतील शेतकरी, मजूरवर्ग अडचणीत सापडला आहे.
बाॅक्स
बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करा
परिसरातील अनेक ग्रामपंचायतींकडे मागील दोन वर्षांपासून खडीकरण करण्यासंबंधित प्रस्ताव मंजूर झाले आहेत. परंतु अनेक गावांच्या तत्कालीन सरपंच व सचिव यांच्या ढिसाळ नियोजनामुळे, तर काही गावांच्या ग्रामसचिवांच्या दुर्लक्षपणामुळे प्रस्ताव अजूनही नूतनीकरणासाठी पाठवला नसल्याचे समजते. अद्याप खडीकरणाची कामे झाली नाहीत, अशा बेजबाबदार सचिवांवर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे
कोट
पावसाने पाणंद रस्ता खराब झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतातील कामासाठी मजूर, खत व बैलबंडी नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाणंद रस्त्याचे खडीकरण तातडीने करण्याची गरज आहे.
- नत्थू राजेराम खाटे, शेतकरी, नंदारा, ता. चिमूर.
210721\img_20210708_182159.jpg
शेतकरी चिखलयुक्त पांदन रस्त्यातून मार्ग काढतांना