दुर्गापूर : आपल्या रास्त मागण्यांसाठी कामबंद करून आंदोलन करणाऱ्या ८१ खासगी ट्रक चालकांना पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयात रवानगी केली. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन तात्काळ त्यांची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी चालकांच्या कुटुंबियांनी वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीच्या कार्यालयापुढे शुक्रवारी धरणे आंदोलन केले. मात्र अद्यापही त्यांची सुटका न झाल्याने सदर प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.वेकोलि दुर्गापूर कोळसा खाणीतील कोळसा इतरत्र वाहून नेण्याचे कंत्राट तीन फौजी कंपन्यांना देण्यात आले आहे. यात हेमकुंड, शंखमुगम, तेरावाली या ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आपले ट्रक चालविण्यासाठी चालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर ट्रक चालकांना कोल इंडिया हाय पॉवर कमेटी कलकत्ताद्वारे वर्ष २०१३ मध्ये किमान वेतन श्रेणी ठरवून दिली. मात्र या खासगी कोळसा वाहून नेणाऱ्या फौजी कंपन्या किमान वेतन न देता आपल्या मनमर्जीनुसार वेतन देऊन त्यांच्यावर अन्याय करीत होत्या. तसेच त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करवून घेण्यात येत होते. काही चालकांना या कंपन्यांनी क्षुल्लक कारणावरून कामावरून काढुन टाकले होते. म्हणून या कंपन्यात कार्यरत वाहन चालकांनी कंपन्यांविरूद्ध कामबंद करून आपल्याला न्याय मिळावा, यासाठी १० डिसेंबरला उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे संप पुकारला. त्यामुळे त्या दिवशी खाणीतील कोळसा इतरत्र जाऊ शकला नाही. ताबडतोब या कंपन्यांनी १२ डिसेंबरला नवीन वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या व त्यांच्याद्वारे कोळसा वाहुन नेण्याचे काम सुरू केले.यास जुन्या वाहन चालकांनी विरोध करून परत काम बंद पाडल्याने सदर कोळसा वाहू कंपन्यांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तब्बल ८१ चालकांना अटक केली व न्यायालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर व नागपूर कारागृहात त्यांची रवानगी केली.१२ डिसेंबरला त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुला-मुलींनी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयापुढे धरणे देऊन त्यांच्यावर लावलेल्या कलमा व त्यांची तात्काळ सुटका करण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यांच्या समवेत बीएमएस संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र अद्यापही सदर चालकांची सुटका झाली नाही. यापुढे हे आंदोलन तिव्र करण्याचा त्यांच्या कुटुंबियांनी इशारा दिला आहे. (वार्ताहर)
वाहनचालकांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांचे आंदोलन
By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST