राजुरा : तालुक्यातील जोगापूर देवस्थानमध्ये वनविभागाने वाघाच्या दहशतीमुळे दर्शनास जाण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
मागील महिन्यामध्ये वाघाची दहशत होती. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे ही यात्रा भरतील, असा अंदाज नागरिक व्यक्त करीत होते. मात्र, बंदीमुळे त्यांची निराशा झाला आहे. दरम्यान, पुन्हा परिसरात वाघ असल्याची चर्चा आहे. वनविभागाने कर्मचारी तसेच मजुरांच्या संरक्षणात भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यांसदर्भात उपविभागीय वनअधिकारी अमोल गरकल यांच्याकडे विचारणा केली असता, राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात चार वाघांचे वास्तव्य व भ्रमण सुरू आहे. जोगापूर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्यांचे नियमित लोकेशन मिळत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून जोगापूर जत्रेवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.