भद्रावती : कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने मागील आणि चालू वर्षाचा मालमत्ता कर पूर्णता माफ करावा, अशा आशयाचे निवेदन सभागृह आणि लॉन मालकांनी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना दिले.
आपल्या निवेदनावर आम्ही चर्चा करू, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी सांगितले.
कोविड-१९ या विषाणूमुळे गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. हा विषाणू संसर्गजन्य असल्याने एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीस तो सहज प्रवेश करतो. या कारणाने मार्च २०२० पासून संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली. हाच कालावधी लग्न आणि इतर समारंभाचा असतो. हा पूर्ण काळ असाच गेला. आता यावर्षी कोरोना कमी होताना दिसताच पुन्हा तो परत आल्याने चिंता वाढली आहे. याचा फटका आमच्या व्यवसायाला बसत आहे. याचा विचार करता सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ या दोन वर्षाचा मालमत्ता कर पूर्णता माफ करावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना देण्यात आले. यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेतो, असे यावेळी सांगण्यात आले. शिष्टमंडळात संजय गुंडावार, राजू शिंदे, दिलीप ठेंगे, मनोज घोरमाडे, अब्बास अली, भुमेश वालदे, राजू गुंडावार, भारत नागपुरे, हनुमान घोटेकर, प्रदीप डोर्लीकर, पुंडलिक नवघरे, संतोष आमने, अशितोष पत्तीवार उपस्थित होते.